संत अमाई माता
🚩🚩श्रावण शुद्ध एकादशी संत अमाई माता पुण्यतिथी.🚩🚩
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या घराण्यातील मुळ पुरुष माऊली ज्ञानदेवांच्या समकालीन असणारे विश्वंभरबुवा यांच्या पत्नी अमाई यांची आज पुण्यतिथी. विश्वंभरबुवा आणि मुले हरी व मुकुंद यांच्या पश्चात आपल्या श्री क्षेत्र देहूच्या देऊळवाड्यातील कुळदैवत, कुळधर्म आणि कुळाचार जतन करून स्वयंभू विठ्ठल- रूक्मिणीची निराधार आयुष्य व्यतीत करून सेवा करणाऱ्या एक दुर्लक्षीत स्त्री संत अमाई माता.
विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव ।
कुळधर्म देव विठ्ठल माझा॥
त्यांची दोन मुले थोरले हरी आणि धाकटे मुकुंद. त्यांनी आपला व्यवसाय सांभाळुन आणि कुळधर्म,कुळदैवताचे जतन करून पांडुरंगाची मनोभावे सेवा करावी अशी अमाई मातेची मनस्वी इच्छा होती.
माझ्या वडीलांची मिरासी गा देवा | तुझी चरणसेवा पांडुरंगा॥
परंतू त्या उभयतांनी मुळचा क्षात्रधर्म स्वीकारून तत्कालीन बलाढ्य देवगिरीच्या हरपाल राय यादव यांच्या पदरी सरदार म्हणून पदभार स्विकारला. दोघेही पुत्र दुर असल्यामुळे अमाई मातेला आपल्या देऊळवाड्यातील विठ्ठलाची परंपरागत सेवा करणे क्रमप्राप्त होते.
अमाई निष्काम चित्तीI
काही न मागे धनसंपत्तीI
परी ऋणी झाला लक्ष्मीपती ॥म्हणोनी ओळगती सर्व सिद्धी॥- महिपती
परंतु कालांतराने अमाई मातेलाही तिच्या पुत्रांनी त्यांच्याकडे बोलाऊन घेतले. अमाईला देहूच्या देऊळवाड्यातील एकट्या पडलेल्या विठ्ठलाची ओढ स्वस्थ बसुन देत नव्हती. काही दिवसांनी इ. स.१३१७ ला देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीचा पुत्र दिल्लीचा सुल्तान कुतुबुद्दीन मुबारक चालुन आला. झालेल्या घनघोर युद्धात हरी आणि मुकुंद हे दोघेही धारातीर्थी पडले. यांच्या समाध्या देवगिरीच्या पायथ्याशी आहेत असे जुणे जाणकार सांगतात. मुकुंदाची पत्नी सती गेली. अशा दुःखद घटनेमुळे अमाई माते वर दुःखाचा डोंगर कोसळला. हरीची पत्नी विठाई गरोदर असल्यामुळे तीला सती जाता आले नाही. सुन विठाईला घेऊन अमाई देहूला परत आल्या.तीचे बाळंतपण निर्विघ्नपणे पार पडावे आणि वाड्यातील परंपरेने चालत आलेली पांडुरंगाची सेवा आणि कुळाचार हरी मुकुंदाच्या पश्चातही हरीच्या मुलाच्या माध्यमातून वंशपरंपरेने चालु रहावा म्हणून अमाई मातेने विठाईला बाळंतपणासाठी तिच्या माहेरी नवलाख उंब्रे येथे पाठवले.कुटुंबात दोनच स्त्रीया होत्या. अमाईला सुख दुःखात साथ देणाऱ्या विठाई शिवाय घरात कोणी नव्हते. तिलाही काळजावर दगड ठेऊन तिच्या माहेरी पाठवल्यामुळे आता अमाई माता एकट्याच देहूच्या देऊळवाड्यात कुळाचाराचे जतन करीत दुःखीत अतःकरणाने जीवन व्यतीत करीत होत्या.
तुका म्हणे सेवा | माने तैसी करू देवा॥
वृद्ध अमाई मातेच्या सेवेचे फळ म्हणून की काय काही दिवसांनी साक्षात परमात्मा पांडुरंग कमरेवरचे हात काढुन त्यांच्या सेवेला देऊळवाड्यात राबत होते. स्वतः रुक्मिणी माता अमाई मातेला स्नान घालुन वेणी फणी करण्यापासून घरातील सर्व कार्य सुनेप्रमाणे पार पाडत होत्या.
सांडोनी महत्वाची थोरी | पायथ्याकडे बसे श्रीहरी॥
स्वहस्ते तिचे चरण चुरी I
रुक्मिणी स्वहस्ते घालून नाहान I वेणी फणी करी आपण ॥-
असा उल्लेख महिपती लिखीत चरित्रात आढळतो. परंतू वृद्धत्वामुळे या थोर मातेचे आषाढी एकादशीचा देऊळवाड्यातील भक्तीरस सेवन केल्यानंतर बरोबर महिन्याने वारकरी सांप्रादायातील पवित्र दिनी श्रावण शुद्ध एकादशीस देहावसान झाले.
श्रावणशुद्ध हरिदिनी साचारI दिवस आला प्रथम प्रहर |... अमाईचे आकर्षोनि प्राणI दिव्यदेह केली न लगता क्षण॥- महिपती
अशा कुळ-वंश उद्धारक विभूती, निस्पृह विठ्ठल भक्त, साध्वी संत अमाई मातेस पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन👏🏻💐
काय वाणूं आतां न पुरे हे वाणी ।
मस्तक चरणीं ठेवीतसें ॥👏🏻
🚩राम कृष्ण हरी🚩

Comments
Post a Comment